शेतकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास मिळावा अपघात विम्याचा लाभ शेतकर्‍यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील शेतीसाठी होणारा वीज पुरवठा हा रात्रीच्या वेळी असल्याने शेतकऱ्यांची पुरेशी झोप होत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांना हृदयविकाराच्या समस्या जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास किंवा कुटुंबीयांना शासकीय शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय किसान मजूर महासंघाने महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्ठमंडळाने अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. यावेळी शिष्ठमंडळाने अब्दुल सत्तार यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करून एक निवेदन दिले. यामध्ये राज्यातील शेतीसाठी वीज पुरवठा रात्रीच्यावेळी करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांची झोप पुरेशी होत नाही. तसेच झोप न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरित होत आहे. अशा स्थितीत हृदयविकाराने किंवा आरोग्य सेवा तातडीने न मिळाल्याने उपचारा अभावी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.

हा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकरिता मोठा अपघातच आहे. त्यामुळे अशा इतर कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, सर्व घटनांना अपघाती शेतकरी मृत्यू म्हणून संबोधन करण्यात यावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्ठमंडळात शंकरराव काशीनाथ दरेकर, नितीन अर्जुन थोरात, आबा चंदर जाधव, भाऊसाहेब रामदास माशेरे, अक्षय एकनाथ माशेरे, किरण साहेबराव दरेकर, विनायक गंगाधर जेउघाले आणि युवराज सूर्यवंशी यांचा समावेश होता.

दरम्यान, राज्यात अपघाती मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक आधार मिळावा यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतात काम करताना वीज पडून मृत्यू होणे, सर्पदंश, विजेचा धक्का बसणे, पूर व विंचूदंश यासह इतर अपघातांमुळे मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास आर्थिक सहकार्य देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षभरात हृदयविकारामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटनांचा समावेश शासकीय शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top