राज्यावर ४८ तास संकट, ७ भागांना रेड अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती?

राज्यात गेल्या ३-४ दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक शहरांना पुराचा धोका आहे. अशात राज्यात पुढच्या काही दिवस हा पाऊस असाच राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्र राज्यात पुन्हा जोमाने सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि अगदी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं अंधेरीत पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांना सूचना….

सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी अति महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावं. घाट माथ्यावर फिरण्यासाठी जाणं टाळा. सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळ/ बस मार्ग या ठिकाणी जाणे टाळा. डोंगराळ भागांत किंवा घाट माथ्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशा सूचना हवामान विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

समुद्रात लाटा उसळणार…

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्रात दुपारी अडीचच्या दरम्यान लाटा उसळण्याची शक्यता आहे. चार ते साडे चार मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबईत वेगवान वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ४५ ते ५५ किमी वेगानं मुंबईत वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top